आई संपावर गेली तर .... निबंध

 आई संपावर गेली तर . . . .  निबंध 

आईला मुलाचा पहिला गुरु म्हटले जाते. आई ही परमेश्वराने दिलेली उत्कृष्ट भेट असते. असे म्हटले जाते की "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी". आई ही कधीही तक्रार न करता घरातील सर्व कामे करते. स्वतः कडे दुर्लक्ष करीत ती आपली मुले आणि कुटुंबाच्या काळजीत लागलेली असतें. पण तुम्ही कधी विचार केलाय की आई जर संपावर गेली तर काय होईल? माझ्या मनात हा प्रश्न आला आणि मी स्तब्ध झालो, विचार करायला लागलो की जर एखाद्या दिवस आईच संपावर गेली तर आम्हा सर्वांचे कसे होईल?

जर माझी आई संपावर गेली तर सकाळी मला व माझ्या वडिलांना उशिरापर्यंत जाग येणार नाही. ज्यामुळे मला शाळेत तर वडिलांना कामावर जाण्यास उशीर होईल. स्वतः पाणी गरम करून आंघोळीला जावे लागेल, स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागतील. आई संपावर गेली असल्याने घरात चहा नाश्ता बनणार नाही. मग मला व वडिलांनाच मिळून कसाबसा नाश्ता बनवावा लागेल. व तो करून वडील कामावर तर मी शाळेत जाऊ. दुपारी घरी आल्यावर अजून जेवणाची अव्यवस्था होईल. घरात जेवण तयार नसल्याने एकतर बाहेरून जेवण आणावे लागेल नाहीतर आम्हालाच बनवावे लागेल. 

स्वयंपाक घरातील सर्व पसारा आम्हालाच आवरावा लागेल. जर माझी सर्दी खोकल्याने तब्येत खराब झाली तर स्वतःच्या हाताने विक्स लावावे लागेल. स्वतःच दवाखान्यात जावे लागेल. बाजारात जाऊन भाजीपाला वडील किंवा मलाच आणावा लागेल.


शेवटी सांगायचे एवढेच आहे की आई कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यासाठी कष्ट करत असते तिच्याविना घर चालणे कठीण. जर आई संपावर गेली तर घरात बहीण भावाची भांडणे वाढतील. सर्व काही कसेबसे होईल आणि अव्यवस्थितपणा वाढेल. आई मुळेच कुटुंबसंस्था टिकून आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आई एका शिक्षकापासून पालनकर्ता पर्यंतची महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणून आपणही आपल्या आईचा कायम सन्मान करायला हवा. तिच्यावर कधीही न रागावता तिला घराच्या कामात मदत करायला हवी. कारण एक वेळेला ईश्वर आपल्या आपल्यापासून नाराज होऊ शकतो पण आई कधीही मुलांपासून नाराज होणार नाही व ती आपल्या कुटुंबाला संपावरही जाणार नाही. हेच कारण आहे ज्यामुळे जीवनात  आईच्या नात्याला इतर सर्व नात्यापेक्षा श्रेष्ठ म्हटले आहे.

स्त्रोत : इंटरनेट