पावसाळ्यातील एक दिवस निबंध
पाऊस किती लहरी! जूनची सात तारीख सरली, तरी पावसाचा पत्ता नव्हता. एवढेच काय ! पावसाची दूरवर कुठे चिन्हेही दिसत नव्हती. उकाड्याने माणसे बेजार झाली होती. पावसाचे नक्षत्र कुठे दडी मारून बसले होते काय माहीत? जमिनीला भेगा पडल्या होत्या. उन्हाच्या गरम झळा आपले अस्तित्व जाणवून देत होत्या. उकाड्याने लोक अतिशय हैराण झाले होते. पावसाचे आगमन जसजसे लांबत होते, तसतसे लोकांच्या तोंडचे पाणी पळत होते. नानाविध प्रकारे लोक वरुणराजाची आराधना करत होते. जमीन नांगरून शेतकरी खिन्नतेने आकाशाकडे डोळे लावून बसला होता. प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा होती की पाऊस पडावा, थंडावा मिळावा.
या उन्हाला कंटाळून मीही आमच्या घराच्या गच्चीवर जाऊन बसलो होतो. अचानक सभोवार अंधारून आले. सोसाट्याचा वारा सुटला. हवेत एक गारवा पसरला.
सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटून गेली. मनावरून सुखाचे मोरपीस फिरले. 'आला, आला, पाऊस आला!' असे म्हणत ते पावसाच्या स्वागताला सज्ज झाले. आणि खरोखरच पाऊस कोसळू लागला. टपोरे थेंब बरसू लागले. खूप उशीर झाल्यामुळे जणू त्यांना कोसळण्याची घाई झाली होती. हा काळ्या ढगांचा तानसेन जणू मेघमल्हाराच्या ताना घेत असावा. आगमनाला उशीर झाल्यामुळे त्याला अपराधी वाटले असावे, म्हणून सतत अखंडपणे अविरत कोसळत होता. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट यामुळे सारे वातावरणच बदलून गेले. मातीचा सुगंध सर्वदूर पसरला होता. पावसाच्या आगमनाने अवघा निसर्ग थक्क झाला होता. तीन तासांनंतर पाऊस ओसरला. अचानक आला तसा अचानक थांबला.
केवढा किमयागार हा पहिला पाऊस ! भोवतालच्या वातावरणात कितीतरी कायापालट झाला होता. आकाशातील काळे अभ्र हरवले होते. आकाश स्वच्छ झाले होते. तृषार्त धरती टवटवीत दिसत होती. पावसामुळे घरात बसून कंटाळलेले लोक बाहेर पडत होते. झाडात दडलेली, पावसात भिजलेली पाखरे आपले पंख फडफडवून जणू वर्षाराणीचे आभार मानत होती. सारे वातावरण चैतन्यमय आणि प्रसन्न झाले होते. आकाशाकडे नजर लावून बसलेल्या त्या शेतकऱ्यांचे डोळे डबडबले होते. आनंदाश्रू होते ते ! पावसाळ्याचा तो पहिला दिवस मी कधीच विसरणार नाही. असा हा किमयागार पहिला पाऊस!
स्त्रोत : इंटरनेट
Social Plugin