घड्याळाची आत्मकथा निबंध

 घड्याळाची आत्मकथा  निबंध 


माझे काम सर्वांना वेळ सांगून वेळेचे महत्त्व समजावणे आहे. आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकजण पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहून आपली कामे करीत असतो. मित्रांनो मी एक घड्याळ आहे. मला एका खाजगी कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आले आहे. या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची दृष्टी माझ्या वर पडते. मी देखील चारही बाजूंना काय चालले आहे ते पाहू शकते. 


माझा रंग लाल आहे व मी दिसण्यात खुप सुंदर आहे. मला एका घड्याळाच्या कारखान्यात तयार करण्यात आले होते. प्लास्टिक, स्टील इत्यादींचा वापर करून मला तयार केले. यानंतर तेथून काही लोक मला इतर घड्याळींसोबत बाजारात घेऊन आले. बाजारातील एका प्रसिद्ध घड्याळ दुकानात मला पाठवण्यात आले. दुकानदार मला इतर घड्याळीं सोबत काचेच्या पेटीत ठेवत असे. दिवसभरात भरपूर ग्राहक त्या दुकानात घड्याळ खरेदी करायला येत असत. परंतु जवळपास 10 ते 15 दिवस मी फक्त ग्राहकांनाच पाहत राहिले. मला कोणीही खरेदी करीत नव्हते. 


एके दिवशी संध्याकाळी एक श्रीमंत व देखणा तरुण त्या दुकानात आला. येताच क्षणी त्याची दृष्टी माझ्यावर पडली. तो व्यक्ती एका मोठ्या कंपनीचा मालक होता व बाजारात खरिदी करीत असताना त्याच्या लक्षात आले की त्याच्या ऑफिस मध्ये घड्याळाची आवश्यकता आहे. त्याने दुकानदाराला मला पॅक करून द्यायला सांगितले. गाडीच्या मागील सीटवर बसवून तो मला त्याच्या ऑफिस च्या कार्यालयात घेऊन गेला. त्याने आपल्या शिपायाला सांगून मला एका उंच जागी लावण्यास सांगितले जेणे करून सर्वांची नजर माझ्यावर राहील.


शिपायाने मला कार्यालयाच्या मुख्य दरवाज्यासमोरच टांगून दिले तेव्हापासून तर आजपर्यंत मी येथेच आहे.  येथील प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असतो. दुर्दैवाने मागील काही दिवसांपासून माझे सेल संपले आहेत व माझी गती कमी होऊन वेळ चुकला आहे. परंतु लोक माझ्याकडे पाहतात आणि लगेच हे घड्याळ खराब झाले म्हणून आपला मोबाईल काढून वेळ पाहून घेतात. परंतु कोणीही मला सुधारण्यासाठी खाली उतारीत नाही आहे. शेवटी मी असेच लटकून वाट पाहण्याशिवाय आणखी काय करू शकते बर?

स्त्रोत : इंटरनेट